बदलत्या हवामानाचा शेतीला फटका ! केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पीक विम्यात होणार महत्वाचे बदल
1 min read
मुंबई दि.९:- गेल्या काही वर्षांपासून भारतात हवामान बदलाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. अनेक भागांत दुष्काळ तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षीही महाराष्ट्रातील मराठवाडा, सांगली, सातारा यांसारख्या शेतीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका शेती आणि संबंधित व्यवसायांना बसत असल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यात झालेल्या नुकसानीचा आणि एकूण परिस्थितीचा आढावा घेत केंद्र सरकारने आता हवामान आधारित विमा योजना सुरू करण्याचा विचार सुरू केला आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे पीक नुकसान कमी करणे आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेमुळे हवामानातील बदलांमुळे होणारे नुकसान भरून काढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. 7 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर करून
ही मदत त्वरित खात्यात जमा केली जाईल असे स्पष्ट केले आहे. केंद्राच्या विमा योजनेमुळे आणि राज्याच्या तात्काळ मदतीमुळे बळीराजाला दुहेरी आधार मिळण्याची शक्यता आहे.
