पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर चोरी; हवेत गोळीबार

1 min read

मंचर दि.६:- आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील ऋषी पेट्रोल पंपावर चौघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून तब्बल १ लाख ९० हजार ३७० रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. ही घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली असून, पळून जाताना एका चोरट्याने हवेत गोळीबार केल्याने परिसरात दहशत पसरली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार चोरटे एका मोटारसायकलवरून आले होते. त्यातील दोन चोरटे आत जाऊन पंपावरील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत ड्रॉवरमधील रोकड हिसकावून घेतली. उर्वरित दोन चोरटे बाहेर उभे राहून लक्ष ठेवत होते. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करू नये म्हणून चोरट्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. दरोड्यानंतर परत जाताना एक चोरटा खाली पडल्याने पकडले जाईल या भीतीने त्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर चौघेही चोरटे मोटारसायकलवरून नाशिकच्या दिशेने पसार झाले.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासले जात आहेत. या प्रकरणी पोलिस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी पेट्रोल पंप चालकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पंपांवर प्रकाश योजना व सीसीटीव्ही कॅमेरे कायम सुरू ठेवावेत, असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!