जुन्नर येथे पोलिसांची रेड; दोन टन मांस जप्त; आरोपी फरार

1 min read

जुन्नर दि.६:- शहरातील माई मोहल्ला येथील जैन मंदिरालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची अवैध कत्तल करून ठेवलेले दोन हजार किलोहून अधिक वजनाचे मांस, तसेच कत्तल करण्याच्या हेतूने आणलेल्या चार गायी जुन्नर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या कारवाईत जप्त केले आहेत. या प्रकरणी चार ते पाच अनोळखी व्यक्तींवर महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम व भारतीय न्याय संहिता कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळाले.पोलीस उपअधीक्षक जुन्नर धनंजय पाटील यांना याबाबतची माहिती मिळताच उपनिरीक्षक संदीप मोरे, अरविंद गटकुळ, हृषीकेश टिटमे आणि अंमलदार कैलास केंद्रे, गणेश शिंदे, दादा पावडे, दीपक वनवे, राहुल सूरलसे, विलास लेंभे, समाधान ताडगे तसेच आरसीपी पथकाने या ठिकाणी जाऊन ही कारवाई केली.माई मोहल्ला येथील पत्र्याच्या शेडमध्ये काही अनोळखी व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल करून त्याचे सुमारे दोन टनांहून अधिक वजनाचे मांस तेथे ठेवले होते. तसेच, चार गायी अवैध रित्या कत्तल करण्याच्या हेतूने बांधून ठेवलेल्या सापडल्या. पोलिसांनी चार गायी आणि दोन टनाहून अधिक मांस ताब्यात घेतले. पोलीस अंमलदार श्रीराम शिंदे यांनी फिर्याद नोंद केली असून, सहायक फौजदार भगवान गिजरे पुढील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!