सेवाभावाला सलाम! व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलचा कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम
1 min read
वडगाव कांदळी दि.६:-“जे स्वतःसाठी जगतात ते जगतातच, पण जे इतरांसाठी जगतात ते खरे जगतात…” असा जीवनमूल्यांनी परिपूर्ण संदेश देणारा ‘चलो जीते हैं’ हा बोधपर चित्रपट पाहताच व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलच्या परिसरात एक वेगळीच भावना दरवळली कृतज्ञतेची, सेवाभावाची आणि आदराची या दिवशी शाळेने एक आगळावेगळा उपक्रम राबवला शाळेतील बस चालक,
स्वच्छता कर्मचारी ( मावशी) तसेच सुरक्षा रक्षक वॉचमन अंकल यांच्या सेवेला मनापासून सलाम करण्यासाठी.या सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांचे मोल ओळखून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमास शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे, समन्वयिका जयश्री कुंजीर, श्वेता कोकणे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
चित्रपटानंतर जयश्री कुंजीर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत “आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक सेवेतील व्यक्तीबद्दल आपली जबाबदारी आणि कृतज्ञतेची भावना कशी असावी” या विषयावर विचारप्रवर्तक प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने आपली मतं मांडत या चित्रपटातील बोध आत्मसात केल्याचे दाखवून दिले.
जयश्री तांगतोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
” शाळेचा पाया फक्त शिक्षक किंवा विद्यार्थी नाही, तर आपल्या आजूबाजूला निस्वार्थपणे काम करणारे हे कर्मवीरही आहेत; त्यांच्या शिवाय शाळेचा दिवसच अपूर्ण राहतो.”या उपक्रमातून शाळेने “सेवा हीच खरी साधना” हा सुंदर संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या मनात आदर, करुणा आणि सहभावना जागवणारा हा प्रयत्न सर्वांच्या मनाला भिडला.खरंच, व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलने या उपक्रमाद्वारे ‘सेवाभावाला सलाम’ करत समाजात मानवी मूल्यांचा नवा आदर्श निर्माण केला आहे.शाळेच्या या स्तुत्य उपक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ दुष्यंत गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
