शरदचंद्र पवार कॉलेज ने केला ‘नवदुर्गाचा’ सन्मान
1 min read
ओतूर दि.४:- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ओतूर येथे शिक्षक व कर्मचारी यांच्या वतीने ‘नवदुर्गा सन्मान 2025’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या खऱ्या जीवनातील नवदुर्गांचा सन्मान करून स्त्रीशक्तीला आदरांजली अर्पण करण्यात आली.
घरात देवीची पूजा केली जाते, परंतु आपल्या आजूबाजूला कार्यरत असलेल्या खऱ्या देवींचा म्हणजेच समाजसेवक, आरोग्यसेविका, पोलीस अधिकारी, बँक कर्मचारी, भाजीविक्रेती, फार्मासिस्ट, जकात नाका कर्मचारी, खानावळ कर्मचारी, पेट्रोल पंप कर्मचारी आणि सफाई कामगार अशा महिलांचा त्यांच्या कार्यस्थळी भेट देऊन शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या उपक्रमाचे आयोजन डॉ. मोनिका रोकडे (विद्यार्थी विकास मंडळ अध्यक्षा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्नील डुंबरे आणि प्रा. काजल फापाळे यांनी विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष जाऊन सन्मानकार्य पार पाडले.या वेळी डॉ. मोनिका रोकडे यांनी सांगितले की,
“घरगुती वा व्यावसायिक क्षेत्रात अथक परिश्रम करणाऱ्या या महिला समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांचा सन्मान म्हणजे नारीशक्तीला दिलेला खरा सलाम आहे.”तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी यु खरात सर यांनी आपल्या उद्गारात सांगितले की, “समाजातील प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया सक्षमतेने कार्य करत आहेत.
त्यांचा सन्मान करणे म्हणजे आपल्या संस्कृतीतील मातृशक्तीचा गौरव करणे होय. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही सामाजिक जाण वाढीस लागते.” कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय वैभव तांबे यांनी शुभेच्छा देत सांगितले की, “शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सदैव सामाजिक उपक्रमांमध्ये आघाडीवर असते.
‘नवदुर्गा सन्मान’ सारख्या उपक्रमांमुळे समाजात स्त्रीशक्तीविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो.” कार्यक्रमात शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शेवटी सर्व सन्माननीय महिलांसह सामूहिक छायाचित्र घेऊन कार्यक्रमाचा समारोप आनंदी वातावरणात करण्यात आला.
