RBI कडून रेपो रेट 5.5% वर कायम; गृह-वाहन कर्जाचे हप्ते ‘जैसे थे’ राहणार
1 min read
मुंबई दि.१:- रिझर्व्ह बँकेच्या (RBI) चलनविषयक धोरण समितीने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी हा निर्णय जाहीर केला. यामुळे रेपो रेट 5.5% वर कायम ठेवण्यात आला आहे.
अनुकूल मान्सून, कमी महागाई दर आणि चलनविषयक धोरणातील लवचिकता यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चांगली गती मिळण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. RBI ने रेपो दरांमध्ये कोणताही बदल न केल्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात. हा दर स्थिर राहिल्यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर सर्व प्रकारच्या कर्जांचे EMI तात्काळ बदलणार नाहीत म्हणजेच ते जैसे थे राहतील. यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाच्या हप्त्यावर कोणताही नवीन बोजा पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की जीएसटी तर्कसंगत केल्यामुळे महागाईवर सकारात्मक परिणाम होईल तसेच वापराला आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. MPC ने चलनविषयक धोरणाची भूमिका तटस्थ ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे भविष्यात दर वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा पर्याय खुला राहील.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशांतर्गत आर्थिक उलाढाल तेजीत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या सहामाहीत जबाबदाऱ्यांशी संबंधित घडामोडींमुळे वाढीला थोडी गती कमी होऊ शकते अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
