श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना यंदा करणार १३ लाख मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप
1 min read
ओझर दि.२२:- जुन्नर तालुक्यातील ओझर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ च्या ४० व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन आज कारखान्याचे संचालक सुरेश गडगे व त्यांच्या पत्नी अमृता गडगे यांच्या हस्ते साध्या पद्धतीने कारखाना कार्यस्थळी पार पडले.
यंदाचा गळीत हंगाम चालू करण्यासाठी सर्व मशिनरी देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून विघ्नहर कारखाना गाळपासाठी सज्ज झाला आहे.ऊस गाळप आढावा व हंगाम नियोजनाबाबत राज्य मंत्री समितीच्या बैठकीत २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरू करण्याची
तारीख जाहीर झाल्यावर विघ्नहर कारखान्याचा चालू गाळप हंगाम सुरू होणार असून १३ लाख मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी सर्व यंत्रणांमार्फत सुयोग्य असे नियोजन करण्यात आले आहे.मागील गाळप हंगामाचे वर्ष विघ्नहर कारखान्याच्या दृष्टीने आव्हानाचे होते.
शासनाच्या धोरणानुसार कारखाना उशिरा चालू झाला त्यातच कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचेही काम चालू होते. आता हे काम पूर्ण झाल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ५००० मे.टनावरुन ७५०० मे.टन झाल्याने चालू गाळप हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रतीदिन ८५०० ते ९००० मे.टन ऊसाचे गाळप होणार आहे.
तसेच इतर प्रकल्पांसहीत ६५ केएलपीडी क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे.ऊसाचे उत्पादन वाढवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन आणि कारखान्यामार्फत देण्यात येणारी खते तसेच इतर सर्व सुविधांचा लाभ घ्यावा, त्याचे आपल्या ऊस उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल.
येत्या हंगामातही नेहीप्रमाणे सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी विघ्नहर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देवून सहकार्य करावे ही विनंती. आजच्या बॉयलर अग्निप्रदीपण प्रसंगी कारखान्याचे सर्वश्री संचालक, अधिकारी व कामगार युनियन, सेवक पतसंस्था, सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सर्व कामगार, कर्मचारी उपस्थित होते.
