जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक गावचा राज्यात गवगवा; राज्यातील पहिले गाव
1 min read
जुन्नर दि.१७:- भू-सांकेतिक क्रमांकाने परिपूर्ण होण्याचा मान बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) गावाने पटकाविला असून रस्त्यांना कायदेशीर ओळख मिळालेले बोरी बुद्रुक हे गाव राज्यात पहिले ठरले आहे.गावच्या या रस्त्यांना कायदेशीर अभिलेखात स्थान देण्यासाठी शासनाच्या २९ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयानुसार तालुक्यातील
सर्व रस्त्यांची नोंद घेऊन त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. अशा प्रकारे भू संकेतांक क्रमांकाने परिपूर्ण होण्याचा मान बोरी बुद्रुक गावाने पिकवला आहे.बोरी बुद्रुक येथील ग्रामपंचायत, ग्रामस्थ, महसूल अधिकारी, मंडल अधिकारी व सामाजिक कार्यकत्यांच्या लोकसहभागातून गावात शिवार फेरी काढण्यात आली.
या फेरीत आधीच नकाशावर असलेले ५ रस्ते आणि नव्याने निश्चित झालेले ६९ शेतरस्ते, पाणंद, शिवरस्ते व वहिवाटीचे रस्ते यांचा समावेश करण्यात आला. एकूण ७४ रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन त्यांची ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.
त्यानंतर महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या संयुक्त पथकाने या रस्त्यांचे सीमांकन करून जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर नोंद केली आहे. बोरी बुद्रुक गाव हे महाराष्ट्रातील ७४ रस्त्यांना सांकेतांक देऊन नकाशावर जीआयएस प्रणालीद्वारे स्थान मिळविणारे पहिले गाव ठरले आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील लाखो शेतकरी, ग्रामस्थांच्या रोजच्या वापरातील रस्त्यांना कायदेशीर ओळख मिळणार असून, त्याची पायाभरणी बोरी बुद्रुकमधून झाली आहे. शासन निर्णयानुसार गावनकाशांवर असलेले तसेच प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले
खालील प्रकारचे रस्ते नोंदविले जाणार आहेत. यात ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते,ग्रामीण मार्ग (पोटखराबा),पायमार्ग (पोटखराबा), शेतरस्ते-वहिवाटीचे रस्ते (नकाशावर नसलेले; परंतु प्रत्यक्षात वापरात असलेले) या रस्त्यांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यांची माहिती प्रपत्र १ आणि प्रपत्र २ मध्ये संकलित करण्यात येणार आहे.
रस्ता कोणत्या गटातून जातो, किती शेतकरी त्यामध्ये समाविष्ट आहेत, रस्त्याची अंदाजे लांबी व रुंदी किती आहे, रस्ता कोठून सुरू होऊन कोठे संपतो, यासह सविस्तर तपशील भरणे बंधनकारक करण्यात आले आहे, तयार झालेले प्रपत्र प्रत्येक गावातील ग्रामसभेत ठेवले जाणार असून, त्यावर ग्रामसभेची मंजुरी घेण्यात येईल.
या वेळी शिवार फेरीतून कोणते रस्ते अतिक्रमित किंवा बंद आहेत, याचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करावा लागेल. अशा प्रकरणांवर मंडळस्तरावर ग्रामस्तरीय रस्ता समितीच्या उपस्थितीत रस्ता अदालत घेऊन निर्णय देण्यात येईल,
जीआयएस प्रणालीद्वारे नोंदणी ग्रामसभेत मंजूर झालेल्या सर्व रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन उपाधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयास माहिती पुरवली जाईल. त्यानंतर जीआयएस प्रणालीद्वारे प्रत्येक रस्त्याची नोंद नकाशावर अक्षांश-रेखांशासह केली जाईल,
परिणामी, गावनिहाय नकाशावर सर्व रस्त्यांना क्रमांकासह कायदेशीर ओळख मिळणार आहे. या प्रक्रियेतून नव्याने गाव नमुना १ (फ) तयार होणार असून, रस्त्यांना कायदेशीर अभिलेख मिळणार आहे.——-
प्रतिक्रिया
” आपल्या गावातील पाणंद, शेतरस्ते, शिवरस्ते आणि सर्व वहिवाटीच्या रस्त्यांची नोंद करून त्यांची ग्रामसभेत मंजुरी घ्यावी. शासनाला सहकार्य करून भविष्यातील कायदेशीर अभिलेखासाठी प्रत्येक ग्रामस्थाने सहभाग नोंदवावा.राज्य सरकारच्या या ऐतिहासिक शासन निर्णयाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी शिवार फेरीत सहभागी व्हावे.
सुनील शेळके, तहसीलदार, जुन्नर
——–
——-
प्रतिक्रिया २
“पर्यटन ग्राम स्मार्ट व्हिलेज बोरी मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वामित्व व ग्राम परिवर्तन योजना व ग्राम परिवर्तन प्रवर्तक,सर्व प्रशासकीय अधिकारी ,तहसीलदार, भूमी व महसूल विभागातील सर्व अधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनाने रोवर मशीनद्वारे गावची १६०९ हेक्टर जमिनीची मोजणी करणे शक्य झाले.
त्यामुळे गावातील जमिनीच्या हद्दी निच्छित झाल्यामुळे त्यासंदर्भातील सर्व तंटे व वाद संपुष्टात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शेतजमीन मोजणीचे ‘क’ पत्रक वाटप करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिव,पानंद रस्ते योजनेमुळे मोजणी झाल्याने रस्ते मार्गी लागले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा दिनांक २२ मे २०२५ व २९ ऑगस्ट २०२५ च्या शासन निर्णयानुसार तहसीलदार डॉ.सुनिल शेळके यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी शिवार फेरी,ग्रामसभा घेतली.प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने शेती व शेतीपूरक व्यवसाय ग्रामोद्योग यासाठी रस्त्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावे
म्हणून नकाशावर असणारे व नकाशावर नसणारे एकूण ६९ रस्ते ग्रामसभेत सर्वांनी एकजुटीने मंजूर करुन घेतले ह्या सर्व कामामध्ये बोरी बुद्रुक मधील सर्व ग्रामस्थांचे खूप मोठ सहकार्य मिळाले.”
युवराज कोरडे
तंटामुक्ती अध्यक्ष बोरी बुद्रुक
———–
