जुन्नर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांना यश

1 min read

साकोरी दि.२९:- वि‌द्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल व पी.एम. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, साकोरी (ता.जुन्नर) या नामवंत शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे अंतर्गत समर्थ स्पोर्ट्स अकॅडमी बेल्हे (बांगरवाडी) येथे संपन्न झालेल्या जुन्नर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आपल्या कुशाग्र कौशल्याने आणि परिश्रमाने उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.62 किलो वजनी मुले या गटात इयत्ता ८ वी इंग्रजी माध्यमातील सर्वेश निलेश सोनवणे याने अतिशय शौर्य आणि आत्मविश्वास दाखवत ‌द्वितीय क्रमांक पटकावत मैदान गाजवले. त्याची झुंजार खेळी उपस्थितांच्या मनात घर करून गेली.69 किलो वजनी मुली या गटात इयत्ता ९ वी सेमी इंग्रजी माध्यमातील स्वरा योगेश भोर हिने देखील अतुलनीय जिद्द, चिकाटी आणि निडरता दाखवत आपल्या गटात ‌द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशाने शाळेतील मुलींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.या यशामागे आहे क्रीडा शिक्षक लांबडे गौरव यांचे परिपूर्ण मार्गदर्शन आणि कठोर मेहनत. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शारीरिक प्रशिक्षणच नव्हे, तर मानसिक सुदृढतेचेही धडे दिले.या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या प्रशिक्षकाचे संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग साळवे यांनी हे यश केवळ वि‌द्यार्थ्यांचे नाही, तर पालकांचे, शिक्षकांचे आणि संपूर्ण संस्थेचे आहे. शाळेतील दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट क्रीडा सुविधा आणि वि‌द्यार्थ्यांवर घेतली जाणारी वैयक्तिक लक्षवेधक काळजी यामुळेच आमची मुले विविध क्षेत्रांमध्ये यशाच्या शिखरावर झेपावत आहेत. या शब्दात कौतुक केले.तसेच पी.एम. हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य रमेश शेवाळे व विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्या रुपाली भालेराव यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!