जुन्नर तालुक्यात ‘पक्षी थांबे’ मोहीम
1 min read
जुन्नर दि.१९:- येडगाव (ता. जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश नेहरकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली’पक्षी थांबे’ (Bird Perches) बसवून त्याचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. तालुका कृषी अधिकारी, जुन्नर, गणेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी नारायणगाव मंडळाचे कृषी अधिकारी राणु आंबेकर सहाय्यक कृषी अधिकारी येडगाव, प्रतिभा अडागळे यांनी शेतकऱ्यांना ‘पक्षी थांबे’ बसवण्याचे फायदे समजावून सांगितले. सोयाबीन पिकावर पडणाऱ्या विविध किडींचा नैसर्गिकरित्या बंदोबस्त करण्यासाठी पक्षी थांबे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.
या थांब्यांवर बसून पक्षी शेतातील किड्यांना सहज टिपून खातात, ज्यामुळे रासायनिक औषधांचा वापर कमी होतो आणि उत्पादन खर्चात बचत होते.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. प्रकाश नेहरकर यांनी आपल्या शेतात यशस्वीरित्या पक्षी थांबे बसवून.
इतर शेतकऱ्यांसमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. यामुळे परिसरातील इतर शेतकरीही हा प्रयोग करण्यास प्रोत्साहित होतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली. कृषी विभागाच्या या प्रयत्नांमुळे शेतीत नैसर्गिक आणि शाश्वत उपाययोजनांचा वापर वाढण्यास मदत होणार आहे.
प्रतिक्रिया
“सोयाबीन पिकावर ढगाळ हवामानामुळे मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव होतो . पक्षी थांबे केल्याने नैसर्गिक रित्या पक्षांद्वारे किडींवर नियंत्रण आणता आले. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर परिसरातील अनेक शेतकरी पक्ष थांबणे लावत आहेत.”
प्रकाश नेहरकर
सोयाबीन उत्पादक शेतकरी येडगाव
