पेमदऱ्यातील कला केंद्राचे काम बंद; तहसीलदार सुनील शेळके यांचे आदेश

1 min read

जुन्नर दि.६:- जुन्नर तालुक्यातील पेमदरा येथील कला केंद्र उभारण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला होता. मात्र, शिवप्रेमी आणि स्थानिकांच्या विरोधानंतर तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी बांधकाम थांबविण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे. या प्रकाराने शिवजन्मभूमीच्या सभ्य संस्कृतीला तडा जाईल,यासाठी विविध थरांतून या कला केंद्राच्या उभारणीला विरोध होऊ लागला आहे. अनेकांनी शिवजन्मभूमीत कला केंद्र उभारूच नये, अशी भूमिका घेतली आहे. पेमदरा ग्रामस्थांकडूनदेखील यासाठी संघर्षाची भूमिका घेण्यात आली आहे. असे केंद्र उभे राहिल्यास जुन्नर तालुक्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, या हेतूने सामाजिक कार्यात अग्रभागी असलेल्या काही व्यक्तींनी या कलाकेंद्राच्या उभारणीविरोधात उपोषणाचा इशारा दिला.दरम्यान, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू पाटे यांनी या विरोधात भूमिका घेऊन या कला केंद्रावर तत्काळ बंदी घालण्यात यावी, या मागणीचे पत्र महसूल विभागाला पत्र दिले होते. विरोधाची धार तीव्र झाल्यानंतर तहसीलदारांनी या केंद्राचे बांधकाम तत्काळ थांबविण्याचा आदेश जारी केला आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकारची केंद्रे जुन्नर तालुक्यात उभारली जाणार नाहीत, असे संकेत या निमित्ताने मिळाले असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.याठिकाणी परवानगीशिवाय, ग्रामस्थांचा विरोध असतानाही बांधकाम सुरू असल्याने संबंधित विभागाने कला केंद्रचालकांना सूचना देऊनही कला केंद्राचे काम मात्र जोरात सुरू असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. पेमदरा येथील कला केंद्राला स्थानिकांचा मोठा विरोध असूनही विरोध न जुमानता हे बांधकाम सुरू असल्याने ‘या कलाकेंद्रावर नक्की वरदहस्त कुणाचा?’ असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!