पोल्ट्री शेडसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू
1 min read
आंबेगाव दि.३:- आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायिकांच्या शेड नोंदणीसाठी विशेष मोहीम वेगाने सुरू असून, शेतकऱ्यांनी आपापल्या पोल्ट्री शेडची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत साळवे यांनी केले.
राज्य शासनाने पोल्ट्री व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा दिल्यानंतर पोल्ट्री शेडची ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती.ही नोंदणी मोहीम आंबेगाव तालुक्यात राबवली जात आहे.राज्य शासनाने दिलेल्या कृषी समकक्ष दर्ज्यामुळे ही नोंदणी अधिक महत्त्वाची ठरते.
त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायासंदर्भातील सर्व आवश्यक माहिती ऑनलाइन नोंदणी अर्जावर करावी. आंबेगाव तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायिकांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी येत असल्यामुळे, ही नोंदणी जवळच्या पशुसंवर्धन दवाखान्यातील डॉक्टरांकडे करण्याची मागणी महाराष्ट्र पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश तापकीर,
वसंत शिंदे, धनंजय ढूमणे आणि संघटनेचे मार्गदर्शक प्रमोद हिंगे पाटील, शफीभाई मोमीन यांनी केली होती. या मागणीची दखल घेत तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत साळवे यांनी प्रत्यक्ष नोंदणी मोहीम सुरू केली आहे.
