व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूलमध्ये कारगिल विजय दिवस आणि इन्व्हेस्टिचर सेरेमनी संपन्न
1 min read
वडगाव कांदळी दि.२६:- विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे कारगिल विजय दिवस आणि इन्व्हेस्टिचर सेरेमनी या दोन्ही कार्यक्रमांचा भव्य संयुक्त सोहळा शालेय प्रांगणात अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, नेतृत्वगुण व जबाबदारीची जाणीव या मूल्यांची पेरणी करणारा हा सोहळा विविध उपक्रमांनी परिपूर्ण ठरला.कार्यक्रमाची सुरुवात – मान्यवरांचे स्वागत, दीपप्रज्वलन व कारगिल युद्धातील शहीद वीरांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली.
यावेळी देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या स्मृती जागवताना उपस्थितांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रमेश खरमाळे- माजी सैनिक व वनरक्षक सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर तसेच स्मिता कवडे. – लिपिक, मनीषा काळे – वनपाल, संतोष आगरकर-वनपाल,
शौकत अली मोमीन वनरक्षक व अक्षय कदम- ऑपरेटर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच पालक – शिक्षक संघाचे उपाध्यक्ष किशोर काकडे तसेच सदस्य वर्षा बढे, सुजाता भोर, स्वाती काकडे, योजना भोर, शुभांगी गुंजाळ, राहुल घाडगे, सत्यवान काळे, सचिन बढे तसेच काही महिला पालकांचीही उपस्थिती लाभली.
विशाल जुन्नर सेवा मंडळाचे विश्वस्त विक्रांत काळे आणि सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड हेही कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यानंतर पार पडलेल्या इन्व्हेस्टिचर सेरेमनीत नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते जबाबदाऱ्यांचे बॅजेस प्रदान करण्यात आले.
हेड बॉय, हेड गर्ल, हाउस कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, यांसारख्या पदाधिकार्यांनी उत्साहात शपथ घेत शाळेचा सन्मान, शिस्त आणि सेवा यांचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमात राष्ट्रीय एकात्मता आणि संघटनेचे प्रतीक ठरलेले मार्च पास्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
रायफल शूटिंगच्या प्रात्यक्षिकाने विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, नियंत्रण व समतोल यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कराटे प्रात्यक्षिकातून त्यांच्या आत्मसंरक्षण कौशल्याचा प्रभावी परिचय झाला. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी – विद्यार्थ्यांच्या नेतृत्व,
शिस्तआणि विविध कला कौशल्य या गुणांचे कौतुक करून त्यांना उत्तम मार्गदर्शन केले.कार्यक्रमातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र जुन्नर यांच्या वतीने आयोजित “एक पेड माँ के नाम ” या उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमासाठी उपस्थित सामाजिक वनीकरण
विभागातील सर्व प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्यावतीने नवनिर्वाचित हेड बॉय,हेड गर्ल तसेच कॅप्टन व व्हाईस कॅप्टन यांना एक एक रोप देऊन या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आणि “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
एवढेच नव्हे तर ,शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक याप्रमाणे वृक्षरोपांचे वाटपही करण्यात आले. उपस्थित मान्यवरांपैकी वनपाल मनीषा काळे यांनी वृक्षांचे महत्त्व सांगणारे तसेच देशाभिमान जागृत करणारे एक सुंदर गीत सादर केले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. जयश्री कुंजीर व श्वेता कोकणे यांचेही सहकार्य लाभले. कार्यक्रमासाठी शाळेच्या शिक्षिका पुनम राऊत व किरण मुळे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले; तर शिक्षिका नीलम शेळके यांनी समारोप करताना उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे तसेच सी.ई.ओ. दुष्यंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व संचालन सर्व क्रीडा शिक्षक, कलाशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीआणि विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे केले.
देशप्रेम आणि नेतृत्वाचा संगम साधणाऱ्या या दुहेरी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मभान, जबाबदारी आणि राष्ट्रप्रेम यांची बीजे निश्चितच रोवली गेली.
