विधानभवनात फोटोसेशनवेळी उध्दव ठाकरे-एकनाथ शिंदे समोरासमोर

1 min read

मुंबई दि.१७:- विधानभवनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. त्यानंतर फोटोसेशनचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे मंचावर आले असता पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर आल्याचे पाहायला मिळाले.उद्धव ठाकरे मंचावर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आपल्या जागेवरून उठले व उद्धव ठाकरे यांना पुढे जाण्यास जागा दिली. उद्धव ठाकरे थोडे पुढे गेल्यावर तिथेच एकनाथ शिंदे देखील उभे होते. उद्धव ठाकरे जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासमोर आले तेव्हा दोघांनी एकमेकांकडे पाहणे देखील टाळले. तिथेच उभ्या असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूला बसण्यास सांगितले, परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांनाच बसण्यासाठी सांगितले व बाजूला उभे असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बाजूला जाऊन बसले.सगळ्यात आधी अजित पवार आले.आणि दादांनी आपली खुर्ची सगळ्यात आधी पकडली. दादांच्या पाठोपाठ विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि उपसभापती नीलम गोऱ्हे आल्या. हे सगळे नेते खुर्चीवर स्थिरस्थावर होताच पाठीमागून मुख्यमंत्री आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि राम शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसले. अंबादास दानवेंचा आज विधानपरिषदेतून निरोपसमारंभ झाला. त्यामुळे दानवे आले आणि मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या खुर्चीत बसले. तोपर्यंत पंकजा मुंडे, चित्रा वाघ आणि इतर आमदार फोटोसाठी पाठीमागे उभे राहिले.तेवढ्यात एकनाथ शिंदे फोटोसेशनसाठी आले. एकनाथ शिंदेंनी धावत धावत आपली खुर्ची पकडली. कॅमेऱ्याची फ्रेम सेट झाली. फोटोग्राफर म्हणाले आता हलू नका. फोटो काढून सगळे जण उठले. पण तेवढ्यात पाठीमागून उद्धव ठाकरे आले. उद्धव ठाकरे आल्यावर पुन्हा फोटो काढायचं ठरलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना नमस्कार केला. मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना खुर्चीवर बसवण्यासाठी बोलावलं मात्र उद्धव ठाकरे सरळ चालत पुढे गेले. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या जवळ पोहोचताच एकनाथ शिंदेंनी चष्मा नीट करुन पुन्हा लावला. शिंदेंनीही ठाकरेंकडे पाहिलं नाही, ठाकरेंनीही शिंदेंकडे पाहिलं नाही.उद्धव ठाकरे येताच नीलम गोऱ्हे खुर्चीतून उठल्या. नीलम गोऱ्हे नेमक्या शिंदेंच्याच बाजूच्या खुर्चीत बसल्या होत्या. नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. प्रसंग बडा बाका होता. उद्धव ठाकरे शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसणार का, याची तमाम महाराष्ट्राला उत्सुकता असताना उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीत बसायला नकार दिला.एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचीही एकमेकांकडे पाठच होती. अंबादास दानवे आले आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्या जागेवर चलण्याची विनंती केली. मात्र उद्धव ठाकरेंनी त्यालाही नकार दिला. अखेर एका बाजूला एकनाथ शिंदे मध्ये नीलम गोऱ्हे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे खुर्चीत बसले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!