बेल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ; पिंजरा लावण्याची मागणी

1 min read

Oplus_16908288

बेल्हे दि.१६:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील विद्यानगरी परिसरात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून दोन बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. या भागात दोन शाळा असल्याने विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, बोरी रोड परिसरात दोन बिबट्यांनी अनेक दिवसापासून थैमान घातले आहे. रोज बिबट स्थानिकांना दिसत आहे. महिन्याभरापूर्वी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात या परिसरात एक बिबट्या जेरबंद झाला होता. दोन दिवसांपूर्वी मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या मागील शिवाजी गुंजाळ यांच्या घरासमोरील कुत्र्याला बिबट्याने नेले.

तर सोमवार दि.१५ रोजी मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या मैदानात बिबट्यांचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तेथे जवळच असणाऱ्या सदाशिव बोरचटे यांच्या बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये रात्री एक च्या सुमारास दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. या मुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीच वातावरण पसरलं आहे.

बेल्हेश्वर हायस्कूल तसेच मॉडर्न इंग्लिश स्कूल या दोन शाळांचे २००० विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शेतकऱ्यांना ही शेतीची कामे करताना जीव मुठीत धरून करावी लागत आहेत. त्यामुळे येथे पिंजरा लावण्याची मागणी सदाशिव बोरचटे, दावला कणसे यांनी वन विभागाकडे केली आहे. परिस्थिती बघून येत्या एक – दोन दिवसात या ठिकाणी पिंजरा लावण्यात येईल अशी माहिती बेल्हे वनपाल नीलम ढोबळे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!