चंदनापुरी घाटात स्कूल बसचा अपघात; पाच विद्यार्थी जखमी
1 min read
संगमनेर दि.४:- संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात शुक्रवारी (ता.४) सकाळी विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस अपघातग्रस्त झाली. चंदनेश्वर विद्यालयात पठार भागातून विद्यार्थी आणणारी बस साईट गटारात पलटी झाली. या घटनेत सुमारे ४ ते ५ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.
असून त्यांना जवळील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या पुणे-नाशिक महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. सकाळच्या सुमारास, समोरून येणाऱ्या वाहनाने दिलेल्या हूलमुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईट गटारात उलटली.
बसमध्ये जवळपास ३५ विद्यार्थी प्रवास करत होते. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस हवालदार अमित महाजन, तसेच महामार्ग पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मदतकार्य हाती घेतले आणि जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रवाना केले.
