राज्यात वाहनांवरील नवीन कर प्रणाली लागू
1 min read
मुंबई दि.२:- राज्य सरकारने 10 लाखांपर्यंतच्या नवीन वाहन खरेदीवरील कर वाढवून नवीन कार खरेदीदारांना मोठा धक्का दिला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात सीएनजी, एलपीजी आणि लक्झरी वाहने खरेदी करणे 1 जुलैपासून म्हणजेच आजपासून महाग होणार आहेत.
याचा अर्थ असा की, आता तुम्हाला नवीन कार खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.समजा तुम्ही 10 लाख रुपयांची सीएनजी कार खरेदी केली, तर आता 70,000 रुपयांऐवजी 80,000 रुपये कर भरावा लागणार आहे. तसेच 20 लाख रुपयांच्या सीएनजी वाहनावरील कर 1.4 लाख रुपयांवरून 1.6 लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे.
महाराष्ट्रात सध्या 17 लाखांहून अधिक सीएनजी/एलपीजी वाहने आहेत, ज्यामध्ये दुहेरी इंधन प्रकारांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करात सुधारणा आणि 1 टक्के वाढ ही सर्व खासगी सीएनजी/एलपीजी वाहनांना लागू होणार आहे, ज्याचा परिणाम नवीन कार खरेदीदार आणि ऑटो डीलर्स दोघांवरही होणार आहे.
इतकेच नाही तर सरकारने मोटार वाहन कराची कमाल मर्यादा 20 लाख रुपयांवरून 30 लाख रुपये केलीय, म्हणजेच कर देखील 10 लाख रुपयांनी वाढवण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 2025-26 या आर्थिक वर्षात सुमारे 170 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
याव्यतिरिक्त 7500 किलोग्रॅमपर्यंत वजन असलेल्या हलक्या वाहनांवर आता 7 टक्के कर आकारला जाणार आहे, ज्यामुळे सरकारला 625 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच पेट्रोल, डिझेल कारसाठी किंमतीनुसार कर भरावा लागणार आहे.
१० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या पेट्रोल कारवर ११% कर आकारला जाईल. १० ते २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर १२% कर आणि २० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कारवर १३% कर भरावा लागेल.
तर, डिझेल कारवर अनुक्रमे १३%, १४% आणि १५% कर आकारला जाईल.तसेच मालवाहू वाहनांसाठी यापूर्वी त्यांच्या वजनावर कर आकारला जात होता, ते आता बदलून किंमतीच्या ७ टक्के एवढा आकारला जाणार आहे.
