गुरुवर्य ए.गो.देव प्रशालेचा १० वी चा १०० टक्के निकाल

1 min read

साळवाडी दि.१६:- इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेत बोरी खुर्द येथील गुरुवर्य एकनाथ गोविंद देव प्रशालेचा निकाल १००% लागला आहे अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक विजय चव्हाण यांनी दिली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दि.२१ फेब्रुवारी २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत इयत्ता १० वी बोर्ड परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेचा ऑनलाईन निकाल दि.१३ मे २०२५ रोजी मंडळाकडून जाहीर करण्यात आला.

मार्च २०२५ परीक्षेस प्रशालेचे १५ विद्यार्थी बसले होते, सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सलग सातव्या वर्षी प्रशालेचा १०० % निकाल लागला आहे. विशेष प्राविण्यासह- ४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत- ९ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत- २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

प्रशालेतील पाहिले पाच विद्यार्थी पुढीलप्रमाणे:- समीक्षा सुभाष बांगर – ९०.२० %; अंजली सोनुलाल गोंड – ८४.००%; संस्कृती सुभाष साळवे – ७९.२०%; साहिल गणेश गाडगे – ७५.६०%, सायली दत्तात्रय चिंचवडे – ७३.००% वरीलप्रमाणे गुण मिळवून यश संपादन केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसतात, कोणत्याही प्रकारचे कोचिंग क्लास नसतात, शेतकरी, कष्टकरी कुटुंबात शैक्षणिक व अभ्यासासाठी पूरक वातावरण नसते अशा प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार ग्रामस्थ व पालक यांनी काढले.

सर्व यशस्वी विद्यार्थी व प्रशालेचे सर्व शिक्षक – शिक्षकेतर वृंद यांचे सर्वोन्नती मंडळाचे अध्यक्ष विक्रम शिंदे,सचिव नरहरी शिंदे,उपाध्यक्ष लक्ष्मण काळे,गावचे सरपंच कल्पना काळे,उपसरपंच महेश काळे व विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे