तरुणाच्या खुनाबद्दल पाथर्डीतील एकास जन्मठेप
1 min read
पाथर्डी दि.१२:- डोक्यात गोळी झाडून युवकाचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा सत्र न्यायालयाने पोपट गणपत आदमाने (रा. जवखेड दुमाला, पाथर्डी) याला जन्मठेप व एकूण ४२ हजार रुपये दंड ठोठावला. याशिवाय वेगवेगळ्या कलमान्वये शिक्षाही देण्यात आली. पाथर्डीतील शिंगवे कामथ येथे ही घटना घडली होती.प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी या खटल्याचा निकाल शुक्रवारी दिला. खटल्यात सरकारतर्फे सरकारी वकील जी. के. मुसळे यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याचा तपास पाथर्डीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी केला. एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले.
सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी, हवालदार अण्णासाहेब चव्हाण व अरविंद भिंगारदिवे यांनी साहाय्य केले.या खटल्याची पार्श्वभूमी अशी, शिंगवे कामथ येथील योगेश एकनाथ जाधव याचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला, या गोष्टीचा राग मनात धरून कट करून,
पोपट आदमाने हा २४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी कामत शिंगवे येथे गेला व घरात घुसून बाजेवर झोपलेल्या योगेश जाधव याच्या डोक्यात बंदुकीने गोळी मारून ठार मारले. योगेशचे वडील एकनाथ, वसंत खाटीक, नंदा जाधव, दीपा जाधव हे सोडवण्यासाठी मध्ये पडले असता
पोपट आदमाने याने त्यांच्यावर तलवारीने वार करून जखमी केले व त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. एकनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.