दिलीप वळसे पाटील महाविद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना मिळाली नोकरीची थेट संधी
1 min read
निमगाव सावा दि.१७:- श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भव्य रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
हा रोजगार मेळावा चाकण येथील टी.एस.पी.एल.(टॅलेंटकॉर्प सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड) समुहाच्यावतीने आयोजित करण्यात आला. एकूण १०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यापैकी ५० विद्यार्थ्यांची मुलाखतीनंतर नोकरीसाठी थेट निवड करण्यात आली असून त्यांना त्वरित जॉब ऑफर लेटर प्रदान करण्यात आले.
टी.एस.पी.एल. समूहाचे व्यवस्थापक मा. उबाळे व विविध एच. आर. तसेच महाविद्यालयाचे संस्थापक पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्थेचे सचिव परेश घोडे, संस्था प्रतिनिधी कविता पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे तसेच प्राध्यापक व कर्मचारी वर्गांनी पुढाकार घेऊन या भव्य रोजगार महामेळाव्याचे आयोजन केले.
यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून थेट नोकरीच्या संधी मिळाल्या असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी व सहभागी सर्व उमेदवारांनी या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यात असे रोजगार मेळावे यापुढे वर्षातून दोन वेळा महाविद्यालयात आयोजित केले जातील जेणेकरून अशा रोजगार मेळाव्यांच्या
माध्यमातून ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातील गरीब, होतकरू व मेहनती विद्यार्थी व उमेदवारांना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा व महाविद्यालयाचा मानस असल्याचे संस्थेचे संस्थापक पांडुरंग पवार यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा रोजगार मेळावा संपन्न झाल्याने यावेळी त्यांनी प्राचार्यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलम गायकवाड, प्रास्ताविक प्रा. अनिल पडवळ तर आभार प्रा. सुभाष घोडे यांनी व्यक्त केले.