जाधववाडीत वनविभागाची धडक कारवाई; २०१ किलो चंदना सह १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

1 min read

Oplus_131072

बेल्हे दि.७:- जाधववाडी (ता.जुन्नर) येथुन चंदन लाकडाची अवैध वाहतुक होणार असल्याची गुप्त माहिती लिहिल्याने धाड टाकून २०१ चंदनाचे लाकडे जप्त केले आहेत.

या बाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी की, चंदन लाकडाची अवैध वाहतूक सुरु असल्याचे आढळून आल्याने लहू सोमनाथ धुळे (रा. मु.जाधववाडी पो.बोरी बु.) याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी ओतुर लहु विठ्ठल ठोकळ यांना दि.३ रोजी मु.जाधववाडी पो. बोरी बु. ता. जुन्नर येवून अधिसूचित वनोपज चंदन लाकडाची अवैध वाहतूक होणार असलेबाबत गोपनीय माहिती मिळाली होती,

त्यानुसार वनविभागाच्या पथकाने दि.६ रोजी सदर ठिकाणी नियोजित सापळा रचला असता रात्री ८ च्या सुमारास संशयित इसम लहू सोमनाथ धुळे हा त्याच्या घरातून पांढऱ्या रंगाच्या CRETA चारचाकी गाडीने बाहेर पडला असता त्यास घरासमोरच अटकाव करत गाडीची तपासणी करत असताना लहु धुळे हा अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरुन गाडीची चावी घेऊन फरार झाला.

सदर ठिकाणी झटापटीत वनाधिकाऱ्यांनी त्याचेकडील मोबाईल हिसकावून घेतला, त्यानंतर घटनास्थळी पंचासमक्ष गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये चंदन लाकडाच्या तुकड्‌यांनी भरलेल्या ८ गोण्या एकूण वजन २०१.०५७ किलो ग्रॅम, इलेक्टीक / डिजीटल वजन काटा, गलोल व

अॅपल कंपनीचा मोबाईल फोन आणि अवैध वाहतुकीसाठी वापरलेली CRETA चारचाकी गाडी असा एकुण रुपये १५,००,१५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यावेळी सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर वनविभाग जुन्नर अमृत शिंदे यांनी सांगितले सदरील अवैध चंदन वाहतुक गुन्हयातील आरोपी लहू सोमनाथ धुळे हा घटनास्थळावरुन फरार झाला असून त्याच्या शोधाकरीता ठिकठिकाणी वनविभागाची ४ पथके पाठविली असून आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल

वन उपज चंदन हे भारतीय वनअधिनियम १९२७ अंतर्गत अधिसुचित असुन त्याचे अवैध वाहतूक, व्यापार रुपांतरण व साठा करणे इत्यादी प्रतिबंधित असुन त्याचे उल्लंघनाकरिता दोन वर्षापर्यंतच्या कारावासाची तसेच रु.५०००/- पर्यंतच्या दंडाची तरतुद करण्यात आली असल्याने अशा अवैध कृत्यासाठी वनविभागाकडुन कठोर कारवाई करण्यात येईल.

सदर कारवाई अमोल सातपुते (मा.व.से) उपवनसंरक्षक जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत शिंदे सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर वनविभाग जुन्नर, बी. लहू ठोकळ वनपरिक्षेत्र अधिकारी ओतुर तसेच वनपरिक्षेत्र ओतुर मधील सर्व वनपाल, वनरक्षक इतर कर्मचारी, पोलिस स्टेशन आळेफाटा येथील पोलिस कर्मचारी यांचे समवेत पार पाडली असून पुढील तपास लहु विठ्ठल टोकळ वनपरिक्षेत्र अधिकारी ओतुर करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे