तो बिबट्याचा हल्ला नव्हे; धारदार हत्याराने खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट
1 min read
संगमनेर दि.२५:- बोटा (ता.संगमनेर) गावांतर्गत असलेल्या वडदरा येथे बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.२२) घडली होती. बिबट्याने हल्ला करून कुऱ्हाडे यांना ठार केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर धारदार हत्याराने वार करून खून केल्याचे अहवालात समोर आले आहे.
त्यावरून घारगाव पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सुरूवातीला बिबट्याच्या हल्ल्यातच उत्तम कुर्हाडे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते यामुळे या मृत्यूला वेगळं वळण मिळलं आहे. मात्र, खरे कारण हे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे.
याप्रकरणावरून आता पठारभागासह तालुक्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की, बोटा गावांतर्गत असलेल्या वडदरा (केळेवाडी) येथे उत्तम बाळाजी कुर्हाडे (वय ६३) हे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती घारगाव पोलीस व वनविभागाला देण्यात आली.
पोलिसांनी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा उत्तम कुर्हाडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर कुर्हाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता.
रविवारी (दि. २३) एप्रिल रोजी सकाळी कुऱ्हाडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. शवविच्छेदन अहवालातून उत्तम कुर्हाडे यांच्यावर अज्ञाताने धारदार हत्याराने छातीवर, पाठीवर व हातावर वार करून त्यांचा खून केल्याचे उघड झाले.
त्यामुळे याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या खुनाच गुड उकलण्याचं काम पोलीस करत असून या खुनाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे.