महिलांनी वाघिणीसारखं बेडर जगायला शिका:- पूजा थिगळे
1 min read
निमगाव सावा दि.९:- आपल्या देशातील महिलांवरील वाढता अन्याय, अत्याचार, हिंसाचार, बलात्कार व महिलांना मिळणारी अमानुषतेची वागणूक ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज आपल्या समाजात स्त्रीला मिळणारी दुय्यम दर्जाची व असुरक्षिततेची वागणूक विचारात घेता नीती व मूल्य भ्रष्ट होत चाललेल्या समाजामध्ये आज स्त्रियांना वाली राहिलेला नाही.
त्यामुळे महिलांनी स्व:कर्तृत्वावर जिद्द, मेहनत आणि चिकाटीने स्वतःचे विश्व स्वतःच निर्माण केले पाहिजे. महिलांनी आपला इतिहास आठवून जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या व झाशीच्या राणी सारखे खंबीर झाले पाहिजे.
आपला जन्म रडण्यासाठी नसून लढण्यासाठी आहे अशी खुणगाठ मनी मानसी बांधून वाघिणीसारखं बेडर करायला शिकले पाहिजे, तरच भविष्यात स्त्री सुरक्षितता अबाधित राहील असा प्रखर विचार श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित, दिलीप वळसे पाटील कला,
वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये वरिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असणाऱ्या पूजा सुखदेव थिगळे यांनी व्यक्त केला. महाविद्यालयामध्ये आयोजित 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास मंडळ, सांस्कृतिक विभाग व महिला सबलीकरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयांमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयातील सायली भोर, प्रीती भोर, काजल गाडगे, अक्षदा कोरडे साक्षी गाडगे, साईनाथ कोयमहाले यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. नीलम गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. ज्योती गायकवाड, विद्यार्थी विकास अधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्था प्रतिनिधी कविता पवार यांनी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक, आभार व नियोजन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केले.