छगन भुजबळ यांच्या नाराजीचा स्फोट? छगन भुजबळ बंडाच्या तयारीत? म्हणाले…..
1 min read
नागपूर दि.१६:- महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. पक्षानं दिलेली राज्यसभेची ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारतानाच त्यांनी पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहे.
‘जहाँ नही चैना, वहा नही रहना…’ असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. मंत्रिमंडळात आपल्याला स्थान दिलं नाही. मला ज्या पद्धतीने वागणूक दिली आणि अपमानित केलं जातं त्यावरुन मी दु: खी आहे, असं छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले.
यावेळी ते म्हणाले कि, मी सातवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मंत्रिमंडळात मला समाविष्ट न केल्यामुळे राज्यात ओबीसी, इतर मागासवर्गीय आणि मतदारसंघातील लोकं फार क्रोधित आणि दु:खी झालेले आहेत.
लोकं रस्त्यावर यायला लागली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना काही सांगायला पाहिजे आणि काय असेल ते विचारलं पाहिजे त्यामुळे बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार”, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं. एक लक्षात घ्या, मी केवळ मंत्रिपदावरुन, मंत्रीपद मला दिलं किंवा नाही दिलं म्हणून नाराज नाही.
माझ्यासाठी अनेक वेळा अशी मंत्रिपदं आली आणि गेली. मी विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा या विधीमंडळात काम केलेलं आहे. एकटा शिवसेनेचा आमदार असताना 85 ते 90 जणांना अंगावर घ्यायचं काम केलेलं आहे. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही. ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं त्यावरुन मी दु: खी आहे, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.
मंत्रिपद येतात आणि जातात. मी तर अनेकवेळा मंत्रिपदं भूषविली आहेत. मी 1991 मध्ये पहिल्यांदा मंत्री झालो होतो. मुख्यमंत्री झालो, मंत्री झालो, सगळं झालं, परत खाली आलो, परत वरती आलो, प्रश्न असा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा मी होतो आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली.
सर्व म्हणत आहेत तर ठीक आहे, मी राहीन तुमच्यासोबत, असं सांगितलं. मी त्यांच्याबरोबर राहून पुन्हा सर्वांचे वार मीच झेलले, असं छगन भुजबळ म्हणाले. काही मानसन्मान आहे की नाही? जिथे मानसन्मान नाही तिथे तुम्ही मला सोन्याचं पान दिलं तरी काही नाही. मी रोखठोकच बोलतो.
जोपर्यंत जीवाच जीव आहे, अन्याय होईल तोपर्यंत संघर्ष सुरु राहील. लासलगाव-येवला माझा मतदारसंघ आहेत. माझे मतदार आहेत. त्यांच्याशी मी बोलेन. समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी बोलेन आणि नंतर ठरवेन काय करायचं. सर्वांना विचारून निर्णय घेईन. पण एक आहे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं.