गुरुकुल च्या चिमुकल्यांनी बनवले हस्तनिर्मित आकाशकंदील व ग्रीटिंग कार्ड
1 min read
बेल्हे दि.२६:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल,बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दीपावलीनिमित्त विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,पर्यवेक्षक सखाराम मातेले व क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे यांनी दिली.पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त कोलाज कार्यशाळा व फराळ वाटप करण्यात आले.इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी दीपावली निमित्त आपल्या जवळच्या मित्रांना,नातेवाईकांना देण्यासाठी प्रत्येकी दोन-दोन भेट कार्ड बनवले.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी,विविध कला-छटा असणारे आकाशकंदील बनविले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांसाठी पणती सजविण्याची कार्यशाळा घेण्यात आली.त्याचबरोबर सुंदर रांगोळी व मेहंदी काढण्याच्या कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
सकाळच्या परिपाठामध्ये दिवाळी सणाबद्दल माहिती तसेच वसुबारस,धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी,लक्ष्मीपूजन,दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा,भाऊबीज या सहा दिवसाचे तिथीनुसार व दैनंदिन जीवनाशी असणारे महत्व रूपाली भांबेरे,सुनंदा हाडवळे,दिपाली नवले,वैशाली सरोदे,शितल पाडेकर,प्रीती गवळी या सर्व शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर च्या वतीने डॉ.शुभांगी कोकाटे व डॉ.विजया हांडे यांनी आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेले सुगंधी उटणे व आयुर्वेदिक तेल संकुलातील कर्मचाऱ्यांना माफक दरामध्ये यावेळी वितरित करण्यात आल्याची माहिती आयुर्वेदिक हॉस्पिटल चे डॉ.रमेश पाडेकर व डॉ.राजेंद्र निचित यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या व संचालिका स्नेहल शेळके व संचालिका सारिका शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर व सर्व संस्थांचे प्राचार्य,
विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.हा उपक्रम राबविण्यासाठी समर्थ गुरुकुल च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.