आळेफाट्यात एका तोतया पोलिसासह सहा जणांवर गुन्हा; शिक्रापुरात पैशांचा पाऊस भोवला

1 min read

आळेफाटा दि.१६:- शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एकाला पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत एकाच्या घरात तिघांनी पैशाचा पाऊस पाडण्याची बनावट क्रिया करून पोलीस वेशातील तोतया पोलिसासह तिघांनी छापा टाकून पैसे जप्त करीत पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली.

त्यांचा पाठलाग करत तिघांना पकडले असता या प्रकरणी विश्वास भगवान घाग, निलेश ओमप्रकाश सावंत, बशीर इब्राहीम शेख यांसह तीन जणांवर आळेफाटा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

शिक्रापूर येथील संतोष भुजबळ यांना दोघांनी फोन करून आमच्याकडे दैवी शक्ती आहे, आम्ही पैशांचा पाऊस पाडतो, असे बोलून आळेफाटा येथे बोलावून घेत चर्चा करून असा पाउस पाडण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर दोघांनी शिक्रापूर येथे संतोष भुजबळ यांच्या एका घरात बसून पाच लाख रुपये तसेच काही वस्तू ठेवत विधी सुरू केला. संतोषचा मोबाईल देखील त्या विधीमध्ये ठेवत त्याला बाहेर पाठवले. काही वेळात पोलीस वेशातील एका तोतया पोलिसासह

अन्य तिघांनी घटनास्थळी छापा टाकत जादूटोणा करता का, पैशाचा पाऊस पाडता का, असे म्हणून पैसे आणि दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील कारमधून पलायन केले. संतोष भुजबळ यांनी त्यांच्या मित्र व नातेवाईकांच्या मदतीने वाहनाचा पाठलाग करीत चाकणमध्ये त्यांना अडवले.

दरम्यान, चाकण पोलिसांच्या मदतीने त्यांना शिक्रापूर येथे आणले. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे हवालदार अमोल नलगे, राकेश मळेकर, नवनाथ केंद्रे यांनी तिघांना आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना न्यायालयात हजर केले असता दि. १९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे