ऑपरेशन सिंदूर माझ्याशीच जोडलं गेलंय; पाक हल्ल्यानंतर हिमांशीचे डोळे पाणावले, म्हणाल्या, ही तर सुरुवात

1 min read

नवी दिल्ली दि.८:- पहलगाम दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पावलेले नौदलातील अधिकारी विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वी केली.

भारताने पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर 9 ठिकाणी हल्ले केले आहेत. या हल्ल्यात दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अजहरच्या कुटुंबतील 14 जणांचा खात्मा झाला असून अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे.

सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला आहे. मात्र, आपला हा आनंद व्यक्त करताना अनेकजण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

हिमांगी नरवाल हिला देखील ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने बदला घेतल्याचे समजताच त्याही भावूक झाल्या. तसेच, ही दहशतवादाला गाडण्याची सुरुवात आहे, ही संपलं नाही पाहिजे.

या ऑपरेशनसाठी मी भारत सरकारचे आभार मानते. जी घटना माझ्यासोबत घडली, ती पुन्हा इतर कोणासोबतही घडू नये. त्यामुळे, हे ऑपरेशन लगेच संपू नये, असेही हिमांशीने म्हटले.

ऑपरेशन सिंदूर नावाशी मी जोडले गेलेय ऑपरेशन सिंदूर या नावासोबत मी स्वत: जोडले गेले आहे, मी एक जीव गमावलाय. आता, माझ्यासोबत काय घडतंय हे कोणालाच नाही कळणार. पहलगाम हल्ल्यामुळे अनेक आयांनी आपली मुलं गमावलीत, पत्नीने पती गमावले आहेत.

त्यामुळे, ऑपरेशन सिंदूर हे नाव एकदम योग्य आहे. पण, पुन्हा असे ऑपरेशन करायची वेळ येऊ नये, कारण माझ्यासोबत जे घडलं ते इतर कोणासोबतही घडू नये, असे म्हणताना हिमांशी यांना अश्रू अनावर झाले होते.

हिमांशीचा व्हिडिओ झाला होता व्हायरल दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या घातल्याचे वृत्त सगळीकडे पसरले होते. त्यानंतर, देशातील दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. यावेळी, हिमांशीने पुढे येऊन परखडपणे भूमिका मांडली होती.

”मला कोणाविरुद्धही द्वेष नको आहे, जे घडत आहे. लोक मुस्लिम किंवा काश्मिरींच्या विरोधात जात आहेत, आम्हाला हे नको आहे. आम्हाला शांती हवी आहे. अर्थात, आम्हाला न्याय हवा आहे, ज्यांनी त्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

आज आम्ही सर्वजण विनयच्या स्मरणार्थ रक्तदान करत आहोत,” असे हिमांशीने म्हटले होते. तर, पती विनय यांच्या नावाने हातावर मेहंदीही लावली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे