काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात

1 min read

नवीदिल्ली दि.२७:- काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी तिथे मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली आहे. दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली असून त्यांच्या छुप्या अड्ड्यांवर छापे मारण्यात आले. तसेच घातपाती कारवायांसाठी मदत करणाऱ्या 400 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले. कश्मीरमधील गेल्या दोन दशकांतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. भारत सरकारच्या अल्टिमेटमनंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर प्रचंड गर्दी झालीये. भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील २९ एप्रिलपर्यंतच वैध असतील. व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, पर्यटक आणि तीर्थयात्रेसाठी व्हिसा असलेल्यांनी आज भारत सोडावा, असे परराष्ट्र मंत्रालयाचे आदेश आहेत. तर कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही.पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यानंतर शनिवारी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील झेलम नदीत भारताने पाणी सोडले. झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे मुझफ्फराबादमध्ये भयंकर पूर आला आहे. यामुळे प्रशासनाने पाण्याची आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातून पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली जात असून भारताला पाठिंबा मिळत आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीनने दहशतवादाविरोधात भारताला पाठिंबा दिलाय. तर मुस्लीम देशांपैकी इराण आणि युएई यांनीही भारताला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद बिन नाह्यान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला आणि पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे