हरियाणात हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; पायलट बचावला
1 min read
चंदीगड दि.८:- हवाई दलाच्या लढाऊ विमानाला हरियाणात अपघात झाला आहे. पंचकुलातील मोरनी जवळ असलेल्या बालदवाला गावात लढाऊ विमान कोसळलं. त्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. यामुळे परिसरात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आहे. लढाऊ विमानाचा वैमानिक पॅराशूटच्या मदतीनं सुरक्षित उतरण्यात यशस्वी झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचं पथक दुर्घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आलेलं आहे.लढाऊ विमानाचा अपघात अक्षरश: थरकाप उडवणारा होता. विमानाचे तुकडे दूरपर्यंत विखुरले गेले.
भारतीय हवाई दलानं दिलेल्या माहितीनुसार, जॅग्वार लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान तांत्रिक कारणांमुळे दुर्घटनाग्रस्त झालं. वैमानिक सुरक्षितरित्या विमानाच्या बाहेर पडला. त्याआधी त्यानं विमान अधिक लोकसंख्या असलेल्या परिसरापासून दूर नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अखेरच्या काही क्षणांमध्ये वैमानिकानं दाखवलेली समयसूचकता महत्त्वाची ठरली.
हवाई दलानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अपघाताची माहिती दिली. ‘तांत्रिक बिघाडामुळे भारतीय हवाई दलाचं एक जॅग्वार विमान कोसळलं. अपघाताची नेमकी कारणं शोधण्यासाठी हवाई दलाकडून तपासाचे आदेश देण्यात आलेले आहेत,’ असं हवाई दलाकडून सांगण्यात आलेलं आहे.
हवाई दलाकडून लढाऊ विमानाच्या अपघाताचा सखोल तपास करण्यात येणार आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी हा तपास गरजेचा आहे. तपास पथकाचा अहवाल आल्यानंतर विमानाच्या अपघातामागील नेमकं कारण समजू शकेल.